शिवरायांचा अश्वारूढ पुतळा मध्यरात्री शहरात दाखल

औरंगाबाद – शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काल मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरातील क्रांती चौकात दाखल झाला आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली. शिवप्रेमींची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असून चौथऱ्यावर पुतळा कधी बसवायचा याचा मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही.

मागील दोन वर्षांपासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथाऱ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. त्याच सोबत पुणे येथे पुतळा तयार करण्याचे कामही सुरू होते. तयार करण्यात आलेला पुतळा शुक्रवारी एका मोठ्या ट्रेलरमध्ये ठेवून औरंगाबाद कडे निघाला. त्यानंतर शनिवारी रात्री नेवासा येथे मुक्कामी पुतळा थांबवण्यात आला. रविवारी पहाटे वाळुज पासून पुढे एका पेट्रोल पंपावर पुतळा थांबवण्यात आला होता. दिवसा शहरातील वाहतूक लक्षात घेता, मध्यरात्री पुतळा आणण्याचे ठरले. पुतळा आणताना क्रांती चौक परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

ट्रेलर मधून पुतळा खाली उतरवण्यासाठी मोठ-मोठे क्रेन मागवण्यात आले. पुतळ्याची लांबी 21 फुटांपेक्षा जास्त आहे. क्रांती चौकात पुतळ्याचे उर्वरित काम संबंधित कलाकाराकडून पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर चौथऱ्यावर पुतळा बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. यासाठी किती कालावधी लागेल हे निश्चित नाही, असेही मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

दृष्टीक्षेपात पुतळा –
– 31 फुटांचा नवीन चौथरा
– 21 फूट पुतळ्याची उंची
– 2.5 कोटी चौथऱ्याचा खर्च
– 1 कोटी नवीन पुतळ्यासाठी खर्च