सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
गुरुवारी भयानक घटना वाईहून पाचगणीला परतणाऱ्या कुटुंबियांच्या बाबतीत घडली आहे. त्यांची कार क्रमांक (एमएच- 12 ओटी- 6672) ही पसरणी घाटानजीक आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी घाटातील सुरक्षा कठड्यावरील झाडावर जाऊन आदळली. त्यामुळे तब्बल चारशे फूट खोल दरीत कार जाण्यापासून वाचली व त्यातील कारमधील कुटुंबांचे प्राण वाचले.
सातारा जिल्ह्यातील पसरणीचा घाट हा अतिशय धोकादायक आहे. या घाट मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. गुरुवारी असाच एक मोठा अपघात होता होता वाचला. या घाटमार्गातून वाईहून पाचगणीला कारमधून जाणाऱ्या स्थानिक कुलीन ठक्कर व त्यांच्या कुटुंबियांच्या कारला अपघात झाला. घाटातील वळण कारमधील चालकांच्या नीट लक्षात न आल्यामुळे कार घाटातील काही फूट अंतरावरील झाडावर कोसळली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
कामानिमित्त वाईला आलेल्या संबंधित कुटुंबीयांनी आपली कामे संपवून पसरणी घाटातून पाचगणीला निघू लागले. कार पसरणी घाटातून जात असताना सोळा नंबर स्टॉपजवळ त्यांची कार आली असता संरक्षक कठड्यावर चढून दरीच्या बाजूला घुसली. सुदैवाने कारमधील एक पुरुष व दोन महिलांचे प्राण वाचले. पसरणी घाटात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घाटात धुक्यांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे कारमधील चालकाला घाट रस्त्यावरील वळण लक्षात न आल्याने कार रस्त्यावरील सुरक्षा कठड्यावर चढून दरीत गेली. काही फूट अंतर जाताच झाडाला अडकल्याने कारमधील सर्वांचे प्राण वाचले.या अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.