औरंगाबाद | येणाऱ्या काळात नवीन नळ कनेक्शन देणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी पूर्ण रस्ता खोदावा लागणार नाही. यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जमिनी खालून गेलेल्या पाईपलाइनला तीनशे मीटर अंतराने जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. जीपीएसच्या मदतीने पाईपलाइनचे लोकेशन सहज मिळणार असून वॉटर सप्लायमधील हा राज्यातील पहिलाच प्रयोग असणार आहे.
सध्या नऊ जलकुंभ, जलशुध्दीकरण केंद्र आणि दोन एमबीआरचे काम केले जात आहे. या योजनेअंतर्गत जायकवाडी ते नक्षत्रवाडी इथपर्यंत २५०० मिमी व्यासाची डीए ( पोलादी) पाईपलाइन टाकण्यात येणार आहे. ही मुख्य पाईपलाइन असणार आहे. त्याच सोबतच शहरात प्रत्येक मुख्य रस्ता अंतर्गत रस्त्यांवर दोन हजार किमीच्या वितरण वाहिन्या अंथरल्या जाणार आहेत.
राज्य शासनाने औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटींची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) मार्फत जीव्हीपीआर पाइप वॉटर कंपनीकडून केले जात आहे. या योजनेअंतर्गत जमिनीखालून जाणाऱ्या पाईपलाइनला जीपीएस यंत्रणा बसविण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. पुढील काही वर्षांनंतर देखभाल आणि दुरुस्तीची समस्या निर्माण झाल्यास, जमिनीखाली गेलेल्या पाईपलाइनचा नकाशा सहज लक्षात यावा आणि विनाकारण रस्ता खोदण्याची गरज पडू नये. तसेच पाइपचे लोकेशन लगेच लक्षात येऊन दुरुस्तीचे कामही तातडीने करता येणार आहे.
‘नवीन पाणीपुरवठा योजनेला तीनशे मीटर अंतराने जीपीएस यंत्रणा बसविली जाणार असून, यंत्रणेव्दारे भविष्यात रोडच्या कामात किंवा जमिनीखाली दबणारी पाईपलाइन सहज शोधता येईल. त्यामुळे नवीन नळ कनेक्शन देणे, दुरुस्तीचे काम करणे सोपे होईल. गॅस सप्लायमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून वॉटर सप्लायमधील हा पहिलाच प्रयोग असणार आहे.’ असं अधीक्षक अभियंता,एमजेपी अजयसिंग यांनी सांगितले.