सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
लोणंद येथील अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा गुरुवारी दुपारी सुमारास खंडाळा तालुक्यातून मार्गस्थ झाला. तरडगाव या ठिकाणी दाखल होण्याआधी पुरातन ‘चांदोबाचा लिंब’ या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वांचे सायंकाळी पहिले उभे रिंगण पार पडले. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी उपस्थिती लावली होती.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे रिंगण माऊलीचा पालखी सोहळा हा भाविकांना पाहता आलेला न्हवता. त्यामुळे आजच्या पालखी सोहळ्याचे भाविकांना वेध लागले होते. हा सोहळा पाहता यावा म्हणून महिलांसह अनेक वारकरी आधीच गर्दी करून बसले होते. दुपारी सव्वातीन वाजता माऊलींचा पारंपरिक मानाचा नगारखाना आला. यावेळी वैष्णवांच्या उत्साहाने सारा आसमंत भक्तिरसात चिंब झाला होता. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातून दाखल झालेल्या भाविकांनी या रिंगण सोहळ्यास उपस्थिती लावली.
यावेळी तरडगाव येथे माऊलीचा पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर महिलांसह भाविकांनी फुगड्या, फेर धरत पारंपरिक खेळ करीत मनसोक्त आनंद साजरा केला. यावेळी भाविकांनी अश्वाचे पालखीतील माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर मोठ्या भक्तिभावाने डोक्यावर तुळशी वृंदावन, भगवी पताका घेत तरडगाव मुक्कामासाठी वारकरी मार्गस्थ झाले.