औरंगाबाद – विद्यापीठ म्हणजे शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. हजारो विद्यार्थी त्याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात तर तेथील अधिकारी, कर्मचारी, प्रशासन, शिक्षक आपले विद्यापीठ शिक्षणात कसे अग्रेसर राहिल यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु काही अधिकारी, कर्माचारी आपल्या पदाचा गैरवापर करून गैरकृत्य केल्याचा अनेक घटना घडल्या आहेत. असाच एक प्रकार मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घडला आहे. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी रात्री-अपरात्री विचित्र मेसेज करुन ‘संपर्क’ साधण्याचा प्रयत्न केल्याने यांच्याविरुद्ध विद्यार्थीनीने विशाखा समितीकडे तक्रार केली आहे. यामुळे विद्यापीठात खळबळ उडाली असून, जनसंपर्क अधिकाऱ्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी लागणारी माहिती घेण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी एक विद्यार्थिनी जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्या दालनात गेली होती कोरोना संसर्गाची या पार्श्वभूमीवर कोरोना चा नियम पाळत विद्यार्थिनीने चेहऱ्यावर मास्क लावला होता परंतु शिंदे यांनी तिचा चेहरा पाहता यावा यासाठी तिला मास्क काढण्यास सांगितले. त्यानंतर माहितीसाठी म्हणून मुलीने आपला नंबर अधिकाऱ्याला दिला नंतर 3 सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास जनसंपर्क अधिकारी शिंदे यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून विद्यार्थिनी विचित्र मेसेज पाठवले. त्यामध्ये ‘डियर तू खूप सुंदर आहेस तू पहिल्या नजरेत आवडलीस मला तुझ्याशी मैत्री करायची आहे’ अशा विचित्र भाषेत संवाद साधले. विद्यार्थिनीने त्यांना मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर ‘बोल ना तुला राग आला का?’ असे प्रतिप्रश्न केले. तसेच त्यानंतर काही वेळातच त्यांनी मेसेज डिलीट केले. यापूर्वी देखील त्यांनी अनेक मुलींसोबत असे प्रकार केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु काही विभागप्रमुखांच्या भीतीने विद्यार्थिनींनी त्यांच्या विरोधात तक्रार केली नाही. तसेच हे अधिकारी आंबटशौकीन असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे, परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ते आजही त्या पदावर कार्यरत आहेत. परंतु या विद्यार्थिनीने कोणत्याही दबावाला व भीतीला बाली न पडत, विद्यापीठातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी असे वागणे अशोभनीय असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थिनीने केली आहे.
कामाच्या ठिकाणी महिला व विद्यार्थिनींचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा 2013 व विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम दोन मे 2016 नुसार अंतर्गत तक्रार समितीच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडे विद्यापीठाच्या या विद्यार्थीनीने तक्रार दिली आहे. तसेच यासंदर्भातील तक्रार देण्यासाठी विद्यार्थीनी बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गेली असता शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती. एकंदरीतच या सर्व प्रकरणामुळे जनसंपर्क अधिकारी या विरोधात संतापाची लाट उसळली असून, विद्यापीठात प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता संबंधित अधिकाऱ्यावर विद्यापीठ प्रशासन काही कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
“मी प्रॅक्टिकल चा भाग म्हणून विद्यापीठाची माहिती घेण्यासाठी विद्यापीठचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्याकडे गेले 27 ऑगस्ट ला त्यांनी मला माहिती दिली पण मला मास्क काढायला सांगितले जेणेकरून चेहरा दिसेल नंतर 3 सप्टेंबर ला रात्री 10:28 मिनीट नं मला डिअर, मला पहिल्याच भेटीत तू आवडलिस मला मैत्री करायची असे मेसेज रात्री 11:30 पर्यंत केले. याविरोधात विद्यापीठातील अंतर्गत तक्रार केंद्रात मी अर्ज दिला पण मलाच उलट प्रश्न करून हा विषय दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर संजय शिंदे यांना मी पोलिसात तक्रार करतेय हे कळाले तर त्यांनी मला कॉल करून माफी मागितली पण अश्या नालायकांना दरवेळी सोडणे म्हणजे त्यांच्या गैर वर्तवणुकीस खत पाणी घातल्यासारखे होईल. असे प्रकार संजय शिंदे कडून या आधी सुद्धा इतर मुलींसोबत झाले आहेत.” – पीडित विद्यार्थिनी