Saturday, June 3, 2023

ज्याचे या देशावर प्रेम आहे त्याचेच सरकार येणार आहे : उद्धव ठाकरे

कोल्हापूर प्रतिनिधी |सकलेन मुलाणी,

 जो या देशाशी इमान राखतो तो आमचा आहे. या देशावर ज्याच प्रेम असेल त्याचं सरकार असेल. देशात एक देश एक कायदा असला पाहिजे.जो  कायदा इथे आहे तोच कायदा काश्मीर मध्ये पण असला पाहिजे असे सांगत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कलम आम्ही काढून टाकू हे सांगितले ते तुम्हाला मान्य आहे का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

 यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, राम मंदिर बांधणारच, असा मोदी आणि अमित शहा यांनी शब्द दिला आहे. त्याच्या हालचाली सुद्धा सुरू झाल्या आहेत. सैनिकांना हिम्मत देणारं सरकार नसेल तर कशाला त्या सैनिकांनी देशासाठी जीव द्यायचा. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा कलम आम्ही काढून टाकू हे सांगितले ते मान्य आहे का तुम्हाला… आघाडीच्या सर्वांना कासावीस झाल्यासारखे होत आहे. कारण त्यांना माहीत आहे आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर अर्ध्यांना तुरुंगात जावे लागणार आहे. युती करण्याचा निर्णय घेतला तो योग्य की अयोग्य असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केला.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे विचारतात, 5 वर्षांत तुम्ही एकमेकांवर टीका करत राहिला आणि मग का मिठी मारायला पुन्हा गेला ? मला विचारताय मग तुम्ही मिठी मारा असा टोलाही ठाकरें राष्ट्रवादीला लगावला. कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा तरीही तो निवडणूक लढवतोय देशद्रोह बाबत कलम काढलेल काँग्रेस ncp कार्यकर्त्यांना चालणार ? याबाबत पवार राहुल गांधी यांना का विचारत नाहीत ? MIM ची औलाद आज पसरते. औवेसी ने संभाजीनगर येथे जाऊन औरंगजेब च्या थडग्यावर डोकं टेकले ही त्यांची देशभक्ती. पण आमच्या देशात कित्तिके मुस्लिम जवान शहीद झाले आहेत. मी त्यांच्या कबरीवर येऊन डोकं ठेवणार कारण ते खऱ्या अर्थाने देशभक्त आहेत. त्यांनी आमच्या देशासाठी प्राण दिले आहेत.

गर्दी जमवायला आम्हाला चित्रपट ताऱ्यांची गरज नाही पडत. पण ममता बॅनर्जींच्या सभेला बांगलादेशच्या कलाकाराला आणावे लागले. ज्यांचा आमच्या देशाशी काहिही संबंध नाही अशा लोकांना बोलवून मत मागणार ? होय आमचं ठरलं आहे. या देशावर ज्याच प्रेम असेल त्याच सरकार असेल. आमचं ठरलं आहे फक्त म्हणू नका ; करून दाखवा आणि संजय मंडलिकांना खासदार करून संसदेत पाठवा असे आवाहनही यावेळी ठाकरे यांनी उपस्थितांना केले.