पालकमंत्र्यांनी चक्क दहावेळा केले औरंगाबादचे नामांतर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जिल्ह्याचे पालक मंत्री था राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मागील दौर्‍यात औरंगाबादचे नामांतर करण्याची हीच ती वेळ असल्याचे सांगितले होते. त्यावरून पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अशातच त्यांनी केलेल्या या घोषणेचे पालकमंत्र्यांच्या सरकारी दौऱ्याच्या कार्यक्रमात प्रत्यंतर आले.

पालक मंत्री सुभाष देसाई आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम त्यांच्या अधिकृत लेटर हेड वरून जाहीर करण्यात आला. यामध्ये देसाई यांनी एक दोन नव्हे तर तब्बल दहा वेळा औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख केला. विशेष कार्य अधिकारी नितीन शिंदे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आलेल्या दौऱ्याचा उल्लेखच पालकमंत्र्यांचा संभाजीनगर दौरा असा करण्यात आला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे. यापूर्वीदेखील मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाहीर करताना औरंगाबाद विभागाशी संबंधित निर्णयाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडल वर देखील औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. एकंदरीतच आगामी मनपा निवडणूक डोळ्यावर ठेवून शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याचे यावरून जाणवत आहे. परंतु, राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेत असल्यामुळे उर्वरित दोन पक्षांची भूमिका काय असेल या संदर्भातही अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.

इकडे काँग्रेस राष्ट्रवादी यांचा नामांतराला विरोध असताना दुसरीकडे मात्र पालक मंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादचे नामांतर करण्याची हीच योग्य वेळ आहे, सरकारमध्ये आम्ही एकत्रितपणे याचा निर्णय घेऊ असे सांगत हा विषय आपल्या अजेंड्यावर असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले होते. आता तर मात्र राज्याच्या सत्तेत उद्योग मंत्र्यांनी अधिकृत दौऱ्याच्या कार्यक्रमातच संभाजीनगर असा उल्लेख केल्याने या विषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment