सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कासची उंची वाढली पण यांच्या विचारांची उंची कधी वाढणार याचे सातारकरांना कुतुहल आहे. आम्हास सर्वसामान्यांसाठी पोटतिडीक आहे. सार्वजनिक कामात “बाप दाखवा, नाहीतर श्राध्द कर” अथवा “एक घाव, दोन तुकडे” करण्याची भुमिका घेण्याचा वारसा आम्हाला लाभला आहे. लोकहित लक्षात घेवून आम्ही एखादा प्रश्न घेवून कोणाला भेटलो, त्याबाबत जनतेला माहीती दिली तर त्यात वावगं काहीच नाही. ते कधी सार्वजनिक प्रश्न घेवून कोणाकडे जात नसतील आणि जरी गेले तरी त्यात स्वार्थाचा मतितार्थ अधिक असेल तसेच त्यांना कोणी मंत्री महोदय भेटीसाठी कदाचित उभं करत नसतील, असा टोला छ. उदयनराजे भोसले यांनी सोशल मिडियावरून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता दिला आहे.
खासदार उदयनराजेंनी म्हटले आहे की, कोणताही मंत्री मला कसा इतका वेळ देतो, तसा त्यांना वेळ कोणीच का देत नाही अशी सल त्यांना बोचत आहे. त्यांनी आमच्या असुयेपोटीच गरळ ओकलेली आहे. त्याला फार महत्व देत नाही. महोदय, भ्रष्टाचार आणि स्वार्थांध विचाराने बरबटलेल्यांनी भ्रष्टाचाराबाबत आरोप करणे म्हणजे एक विनोद म्हणावा लागेल.
बिनबुडाचे आरोप करण्यामध्ये त्यांचा हाथखंडा आहे. बँकांतील घामाचा पैसा मागण्यासाठी यांच्या घरासमोर याचना करणाऱ्या व्यक्तींना, समस्त सातारकरांनी पाहीलेले आहे. यांनीच प्रचंड प्रमाणात आणि सगळीकडे जबर भ्रष्टाचार केला आहे. काविळ झाली की सर्व जग जसे पिवळे दिसते, तसे सगळेच भ्रष्टाचार करतात असे त्यांना वाटत असावे. त्यांच्या या विफलांगतेची किव वाटते, असेही छ. उदयनराजेंनी म्हटले आहे.