सर्वांत उंच सातारा जिल्ह्यातील वजराई धबधबा लागला फेसाळू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : वैभव बोडके

सातारा जिल्हात महाबळेश्वर-पाचगणी सारखे थंड हवेचे ठिकाण, किल्ले प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर धबधबा, चाळकेवाडीचे विस्तीर्ण असे पवनचक्क्यांचे पठार आहे. तर याच ठिकाणी भारतातील सर्वात उंच असा धबधबा म्हणजे भांबवली-वजराई धबधबा हाही आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनचे आगमन झाल्याने निसर्गरम्य असे वातावरण पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे प्रसिद्ध असलेला वजराई धबधबा फेसाळू लागला आहे. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी सध्या पर्यटकांकडून या ठिकाणी भेटी दिल्या जात आहेत.

सातारा तालुक्यातील वजराई धबधबा परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे धबधब्यातून पाणी वाहू लागले आहे. तर कास तलाव भरल्याने त्यातूनही पाणी ओसंडून वाहू लागले आहे. कास तलावातून जाणारे पाणी पुढे वजराई धबधब्याच्या रूपात कोसळत असल्याने भांबवली येथील वजराई धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. पावसाळा म्हटलं की पर्यटकांसाठी पर्वणीच असते. परळी खोर्‍यातही निसर्गाचा खजिना असून धुवाँधार पावसाने निसर्गाचे रुपडे पालटले आहे. भारतातील सर्वांत उंच असणारा भांबवली-वजराई धबधबा आता चांगलाच फेसाळला आहे.

सातारा जिल्ह्यातील देशातील सर्वात उंच असलेल्या या धबधब्याचे निसर्गरम्य द़ृष्य पाहण्यासाठी सातारा- कास- तांबी- भांबवली असा प्रवास करावा लागतो. भांबवली धबधबा सुमारे 560 मीटर (1840 फूट) उंचीवरुन तीन टप्प्यात कोसळत असल्याने धबधबा हा दुधाचा अभिषेक करत असल्याचा भास होत आहे. पहिल्याच पावसात कास धरण ओव्हरफ्लो झाल्याने धबधबा दुथडी भरुन वाहत आहे. भांबवलीला क वर्ग पर्यटनाचा दर्जा प्राप्त असून पर्यटकांच्या सोयीसाठी वॉच टॉवर, पॅगोडा, पायर्‍या, रेलिंग या सुविधा वनविभागाकडून करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment