घराची भिंत कोसळून पती-पत्नी गंभीर जखमी

हिंगोली : औंढा नागनाथ येथील रहीम चौक परिसरामध्ये राहत असलेल्या इसाखोद्दीन जाहिरोद्दीन खतीब यांच्या घरावर शनिवारी दुपारी तीन वाजता शेजारच्या घराची भिंत कोसळली. यात इसाखोद्दीन जहिरोद्दीन खतीब व त्यांची पत्नी आरेफाबी इसाखोद्दीन खतीब हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या तीन शेळ्यांवर भिंत कोसळून त्या जागीच ठार झाल्या

त्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या मुलीचे रविवारी 25 जुलैला सकाळी दहा वाजता लग्न होते. परंतु लग्नाच्या एका दिवसा अगोदरच शेजारी असलेले पूर्वीचे मालक गजानन बांगर व आत्ताचे मालक अंवर खान पठाण यांच्या घराची भिंत अचानक दुपारी तीन वाजता कोसळली आहे.

याठिकाणी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे शेजारी असलेले अजर इमानदार ,अहमद खान पठाण, समीर इमानदार, शेख कलीम, शेख खतीब, शेख रुस्तम, आश्रम पठाण, अलीम खातीब धावून आले. खाली दबलेल्या इसाखोद्दीन (65) व त्यांच्या पत्नी अरेफाबी यांना ढिगार्यातुन बाहेर काढले. मात्र, तीन शेळ्या जागीच ठार झाल्या असून , महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.

You might also like