सडावाघापुरचा उलटा धबधबा पर्यटकांना लागला खुणावू; तरुणाईने घेतला निसर्गाचा आस्वाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गेल्या काही वर्षांपासुन प्रसिध्दीस आलेल्या सडावाघापुर येथील उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) मान्सूनचा उशिरा आगमनाने नुकताच सुरू झाला असून पर्यटकांना खुणावू लागला आहे. जिल्हयातील पर्यटकांबरोबरच पुण्या मुंबई वरुनही पर्यटक दाखल होत असुन निसर्गाचा अविश्कार पाहुन मंत्रमुग्ध होत आहेत.

तारळे पाटण रोडवर सुमारे 14 किमीवर असणाऱ्या सडावाघापुरला उलटा धबधबा (रिव्हर्स पॉईंट) आहे. दरवर्षी पावसाला सुरुवात झाली कि पर्यटकांना या उलटया धबधब्याचे वेध लागतात. जुलै ऑगस्टमध्ये सडावाघापुर पठारावर पर्यटकांची मांदियाळी दृष्टीस पडते. सुट्टीच्या दिवशी शेकडो गाड्या व हजारो पर्यटक याठिकाणी हजेरी लाउन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जमतात.

सडावाघापुर आणि परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिकांसह जिल्हयाबाहेरील पर्यटक दाखल होत आहेत. सडावाघापुरने हिरवा शालू पांघरूला आहे. विस्तीर्ण पठार, धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या, दाट धुके, धुक्यात हरवलेला रस्ता व कौलारु घरे, थंडगार हवा, सोबत थुईथुई पाऊस, पठारावरुन दिसणारे निसर्गाचे नयनरम्य दृश्य, व कोयनामाई, हिरवाईने नटलेले डोंगर, खोल दरी, डोंगराच्या कडे कपारीतुन फेसाळत येणारे लहान मोठे धबधबे, कैकवेळा पठारावर ढगच उतरल्याचा आभास निर्माण करणारे चित्र असे चित्त प्रसन्न करणारे वातावरण मोहात पाडत आहे.

यात उलटा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला आहे. दरवर्षी पावसाळा सुरु झाला कि पर्यटक येथील उलटधबधबा पाहण्यास दाखल होतात. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने नुकताच उलटा धबधबा सुरु झाला असुन पाहण्यासाठी तरुणाई बरोबरच अनेक कुटुंबे गर्दी करु लागली आहेत.

येथील उलटया धबधब्याचा अविष्कार वाऱ्याच्या  दाबावर अवलंबुन आहे. वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळयाचे पारणे फेडणारा नजारा दृष्टीस पडतो, मात्र अनेकदा वाऱ्याअभावी पाणी उलटे फेकले जात नाही. अशावेळी प्रथमच आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता असते. मात्र धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर छोटेमोठे धबधबे याचा मनसोक्त आनंद ते घेउ शकतात.

सध्या सोशल मीडियावर आमदार शहाजी बापू पाटील यांचा काय झाडी, काय डोंगार काय हाटील हा डायलॉग प्रसिद्ध झाला आहे. त्याच धर्तीवर येथे येणारे पर्यटक काय झाडी, काय डोंगार, काय धुके, काय धबधबा, काय पवनचक्क्या काय निसर्ग समदं ओक्के हाय अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave a Comment