हळद मिटली नाही अन् विवाहितेने संपवली जीवन यात्रा; विहीरीत उडी घेऊन केली आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहतेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सायंकाळी निदर्शनास आले. ही घटना वैजापूर तालुक्यातील माळी घोगरगाव येथे घडली. सदर विवाहीता दोन दिवसांपासून बेपत्ता होती अशी माहिती विरगाव पोलिसांनी दिली असून आत्महत्या की घातपात याचा पोलीस अधिक तपास करत आहे.

सारिका सोमनाथ पेदे ( वय 19, रा नागमठाण ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत विरगाव पोलिसांनी सांगितले की, माळीघोगरगाव येथील गट क्रमांक 65 मधील निवृत्ती यादव नवले यांच्या विहिरीत सदर नवविवाहितेचा मृतदेह आढळला. सारिका चा पंधरा दिवसांपूर्वीच नागमठाण येथील सोमनाथ बेदे यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सारिका माहेरी आपल्या वडिलांच्या घरी आल्यानंतर दोन दिवसांपासून बेपत्ता झाली होती. परंतु नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी माळीघोगरगाव येथील गट क्रमांक 65 मध्ये तिचा मृतदेह आढळून आला. येथील पोलीस पाटील राजेंद्र साळुंखे यांनी विरगाव पोलिसांना माहिती दिली.

यानंतर विरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नवनाथ कदम शिवनाथ सरोदे पोलीस नाईक बामणे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आरोग्य केंद्रात पाठवला. याबाबत पोलिस पाटील साळुंके यांच्या माहितीनुसार विरगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शिवनाथ सरोदे करीत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहितेची आत्महत्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सदरतील घटना आत्महत्या असल्याचा प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सदर घटना आत्महत्या की घातपात परिसरात चर्चा सुरू आहे.

Leave a Comment