न्यायाधीशांना भेटनाचा हट्ट करून न्यायालयात वकिलानेच केला आरडाओरडा

Aurangabad Beatch mumbai high court
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – न्यायाधीशांना भेटण्याचा हट्ट करून न्यायालयात आरडाओरड करीत कक्ष अधिकाऱ्यांचा हात पकडून न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या वकिलाला पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि.१२) दुपारी अटक केली. राजेंद्र बाजीराव जाधव (वय ३६, रा. टाकळी माळी, पिंप्रीराजा, ता.जि. औरंगाबाद) असे वकिलाचे नाव आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत हर्सूल तुरुंगात रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे कक्ष अधिकारी शेषराव नांगुर्डे (वय ५४) यांनी फिर्यादी दिल्यानुसार गुरुवारी (दि.११) दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी हे न्यायालयीन कामकाज करीत होते. त्यावेळी हा वकील तेथे आला. त्याने न्यायाधीशांना भेटायचे असल्याचे सांगितले. त्यावर फिर्यादीने दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत, तुम्ही १५ नोव्हेंबरनंतर पूर्वपरवानगी घेऊन न्यायाधीशांना भेटू शकता. काही तक्रार असल्यास उपप्रबंधकांकडे जाऊ शकता असे सांगितले.

मात्र, त्या वकिलाने न्यायाधीश हे २४ तास नोकर आहेत, ते कधीही उपलब्ध असायला हवेत, मला आत्ताच त्यांना भेटून बोलायचे आहे, असा हट्ट धरला. फिर्यादी त्या वकिलाला समजावून सांगत असताना वकिलाने आरडाओरडा सुरू केला. कसल्या सुट्ट्या, कुठे नोटिफिकेशन निघाले नाही आणि नोटीस बोर्डवरही सूचना लावलेली नाही, असे म्हणत फिर्यादीच्या टेबलवरील कागदपत्रे उचलून खाली फेकली. त्यानंतर फिर्यादीच्या दंडाला पकडून ओढत कामकाजात व्यत्यय आणला. याबाबत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव वकिलाला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.