कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
कराड तालुक्यातील वसंतगड येथे बिबट्याने रात्रभर धुमाकूळ घातला. भरवस्तीत बिबट्या घुसल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली. रात्रीच्या वेळी तीन तासात बिबट्याने चारवेळा दर्शन दिले. या काळात लोकांच्या समोरून एक कुत्री व तिचे पिल्लूही बिबट्याने नेले. त्यामुळे वसंतगड येथील ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (दि. 23) रात्री दत्तात्रय विठ्ठल जामदार यांच्या घरासमोर रात्री 9 ते 12 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिले. या घटनेची माहिती मिळताच लोकांनी जामदार यांच्या घराकडे धाव घेतली. भाऊसो वाळूंज यांच्या शेतात बिबट्या बराच वेळ थांबलेला होता. बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.
वसंतगड येथे गेल्या काही दिवसापासून बिबट्या वारंवार दिसत आहे. गावातील अनेक भटकी कुत्री तसेच बकरीही बिबट्याने फस्त केली आहेत. रात्री बिबट्या फिरत असलेल्या परिसरात पायाचे ठसे उठलेले आहेत. भरवस्तीत बिबट्याच्या एंट्रीने वसंतगडकर चांगलेच धास्तावले आहेत.