औरंगाबाद | शहरात रविवारी दुपारपासून जोराचा पाऊस येत होता. यामुळे अनेक नागरिक पहिल्या पावसाचा आनंद लुटताना पहायला मिळाले. मात्र हर्सूल परिसरातील श्रेयश नगरात राहणारी एक साडेचार वर्षीय बालिका गॅलरीतून पाऊस पाहत होती. पाऊस पाहत असताना गॅलरीतून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. ची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर हरसुल ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हर्षदा उर्फ राणी भगवान वाघ असे मृत बालिकेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार हर्षदाला घरातील सर्वजण लाडाने राणी म्हणायचे. तिचे वडील ट्रॅक्टरचालक आहेत. ते श्रेयस नगर येथे पहिल्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहतात. रविवारी सायंकाळी चार वाजता अचानक अवकाळी पाऊस आला. यावेळी राणीचे आई वडील घरात बसलेले होते. पाऊस पाहण्यासाठी राणी गॅलरीत जाऊन उभी राहिली. खेळताना गॅलरीतून ती खाली कोसळली आणि गंभीर जखमी झाली. तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. सहाय्यक फौजदार एन. एस. जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला. राणी ही पवार यांची एकुलती एक कन्या होती, असे पोलिसांनी सांगितले.