औरंगाबाद | औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून औरंगाबाद शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाजांची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. यामधील एक महेमूद दरवाजा हा शेवटची घटिका मोजत आहे. हा दरवाजा प्रचंड प्रमाणात जीर्ण झालेला असून या परिस्थितीत दरवाजाचे संरक्षण करणे शक्य नसल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट मधून समोर आले आहे. त्यामुळे हा दरवाजा पाडून त्याऐवजी तसाच नवीन दरवाजा बांधण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने घेतला आहे.
मनपाने महेमूद दरवाजाच्या कामासाठी यापूर्वीही निविदा काढली होती. परंतु त्या निविदेतून काढण्यात आलेल्या निकषानुसार आता या दरवाजाचे काम करता येणार नाही. त्यामुळे नवीन निविदा काढण्याचा निर्णय स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने घेतला आहे.
‘महेमूद दरवाजाची स्थिती कठीण असली तरी दरवाजाचा जो भाग सध्याच्या स्थितीत आहे तो तसाच ठेवून काम करणे शक्य होणार नाही तो भाग पाडून पुन्हा जुन्याच पद्धतीने दरवाजाचे बांधकाम केले जाणार आहे. दरवाजाचे जुन्या काळातील बांधणी तसेच ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून दरवाजाचा जो भाग पाडला जाईल त्या भागातील दगडांवर नंबर लिहून त्याच नंबरने दगडांची मांडणी केली जाईल.’ असे स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी सांगितले.