व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ गॅंगवॉरमधील मुख्य आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद – जुन्या वादाचा सूड घेण्याच्या भावनेतून प्लॉटिंगचा व्यावसायिक 25 वर्षीय तरुणावर टोळक्याने 15 जानेवारीरोजी चाकूने तब्बल 36 वार करून निर्घृणपणे खून केला होता. या गॅंगवारमधील मुख्य आरोपी तालेब सुलतान चाऊस याला गुन्हे शाखेने दौलताबादेतून बुधवारी सायंकाळच्या सुमारास बेड्या ठोकल्या.

हे गॅंगवार मिसारवाडीतील गल्ली क्रमांक नऊमध्ये घडले होते. हसन साजिद पटेल असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन तर इतर दोघांना जिन्सी, सिडको पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या होत्या. तर यातील पाचजण फरार होते, त्यापैकी मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र अजूनही चारजण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.आरोपी तालेब सुलतान चाऊस हा मूळचा परभणी जिल्ह्यातील पाथरीचा राहणारा आहे, अनेक वर्षापासून त्याचे कुटूंबीय औरंगाबादेत स्थिरावले आहेत. शनिवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान त्याने साजेदचा खून करुन रेल्वेने थेट पाथरी गाठले. ही माहिती गुन्हे शाखेला सुत्रांकडून मिळाली होती.

दरम्यान त्याला सुत्रांनीच दौलताबाद येथे नातेवाईकांकडे आणले. त्यानंतर जिन्सी पोलिस आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके यांच्या पथकातील किरण गावंडे, विठ्ठळ सुरे, ओमप्रकाश बनकर,नवनाथ खांडेकर, संजय राजपूत ठाकूर यांच्या पथकाने दौलताबादेतून बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे मृत हसन याच्यावर झालेल्या 36 वार यापैकी सर्वात जास्त वार हे आरोपी तालेब यानेच केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. याशिवाय तालेब यालाही मारहाणीदरम्यान 11 टाके पडल्याचे पोलिसांनी सांगितले