औरंगाबाद | वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेत घाटीतील रद्द झालेली एमसीएच विंग पुन्हा मिळावी यासाठी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी अमित देशमुख यांना एम सी एच विंग ची सर्व कागदपत्रे सादर केली. ही फाइल तपासून यावर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अमित देशमुख यांनी दिले.
एमसीएच म्हणजे माता व बाल संगोपन केंद्र या विंग बाबत मंत्री देशमुख यांना त्यांच्या खात्याकडून योग्य माहिती देण्यात आलेली नव्हती. देशमुख यांनी आरोग्य खात्याच्या सचिवांकडून माहिती घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले. यावेळी माजी शहराध्यक्ष नामदेव पवार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया उपस्थित होते. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री अनिल पटेल आमदार सतीश चव्हाण यांनी यावेळी देशमुख यांच्याकडे सर्व कागदपत्रे सादर केली.
घाटी मध्ये 90 बेड उपलब्ध असून दीडशे महिला भरती होतात. यामुळे ही सुविधा गरजेची असल्याचे माजी शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी सांगितले. घाटी मध्ये मराठवाड्यासह विदर्भ खानदेशातील गरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात, जर एमसीएच विंग झाला तर त्यांना फायदा होईल तसेच एमसीएच विंग रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणीही आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून करण्यात आली. याबाबत बुधवारी आरोग्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.