बहुप्रतीक्षित औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाला मिळणार गती; मार्गावर 17 स्थानके निश्चित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – प्रस्तावित औरंगाबाद-अहमदनगर या 115 किलोमीटरच्या नव्या रेल्वेमार्गाला गती मिळाली असून रेल्वे विभागानेच या मार्गावरील 17 स्टेशनची नावे निश्चित केली आहेत. या मार्गाच्या सर्वेक्षणाला 18 कोटी 75 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर एकूण खर्च 1585 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2021 पर्यंत या मार्गाचा डीपीआर पाठविण्याबाबत रेल्वे विभागाने कळवले आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास उद्योगवाढीला मोठी चालना मिळणार आहे.

औरंगाबादहून पुण्याला शिक्षण, नोकरी आणि व्यावसायिक कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच येथील उद्योजकांची पुण्यातील उद्योगांशी देवाण-घेवाण आहे. त्यामुळेच अनेक वर्षांपासून शहरातील सामान्य जनतेपासून उद्योगपती, व्यावसायिक, पर्यटक हे औरंगाबाद-पुणे रेल्वेमार्गासाठी आग्रही भूमिका मांडत आहेत. या रेल्वे मार्गाचाप्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य व केंद्र सरकारसमोर मांडला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ औरंगाबाद ते अहमदनगरपर्यंतच्याच रेल्वे मार्गाला परवानगी दिली आहे.

115 किमी मार्गासाठी 138 पूल बांधावे लागणार
औरंगाबाद ते अहमदनगरपर्यंतच्या 115 किलोमीटर रेल्वेमार्गासाठी एकूण 138 पूल बांधावे लागणार असून त्यात 15 मोठे तर 56 छोटे पूल, 17 आरओबीएस आणि 50 आरयूबीएसचा समावेश असणार आहे. औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वेमार्गासाठी 642.689 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार असून या मार्गासाठी एकूण 1 हजार 585 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सध्या 265 किलोमीटरचे अंतर
सध्या रेल्वेने औरंगाबाद-मनमाड-नगर-दौंड-पुणे हे अंतर 265 किलोमीटरचे आहे. मात्र यात मनमाड वगळून औरंगाबाद-नगर थेट जोडल्यास हे अंतर अवघ्या 115 किलोमीटरपर्यंत कमी होणार असून यात तब्बल 150 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. यापुढे नगर-दौंडमार्गे पुण्याला जाण्यास वेळही कमी लागेल. हा रेल्वेमार्ग झाल्यास नागरिकांच्या सोयीसह उद्योगवाढीला चालना मिळणार आहे.

Leave a Comment