३ किमी चा चिखलमय रस्ता ठरला आदिवासी युवकाच्या मृत्यूचे कारण ;परभणी जिल्हातील ग्रामीण रस्ते बनले मृत्युचे सापळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे 

या पावसाळ्यात परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे रस्ते लोकांच्या जीवाशी खेळत असून दोनच दिवसांपूर्वी गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील महिलेचा विजेचा शॉक लागल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच सोमवारी सायंकाळी पुन्हा चिखलमय रस्त्याने जाताना वेळेत उपचार न भेटल्यामुळे एका 32 वर्षीय आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात घडली आहे .त्यामुळे स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त केला जातोय .

यासंबंधी सविस्तर माहिती अशी कि ,पाथरी तालुक्यातील वाघाळा गावापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर आदिवासीबहुल पारधी समाजातील कुटूंबांची शेती असल्याने या ठिकाणी वस्ती निर्माण झालेली आहे .परंतु मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी जाण्यासाठी पक्का रस्ता नाही .शासनाकडून या ठिकाणी राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वस्तीशाळा बांधून देण्यात आली असून इतर भौतिक सोयी सुविधा मात्र स्थानिक नागरिकांच्या नशिबी अजूनही आल्या नाहीत . प्रत्येक पावसाळा या लोकांच्या जीवाशी खेळत असून उपचाराअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने यापूर्वीही परिसरात राहणाऱ्या दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर सोमवार २६ रोजी दुपारी पुन्हा एका युवकाचा चिखलमय रस्ता तुडवत दवाखान्यात उपचारासाठी
नेत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .

राजेभाऊ रामा पवार (वय ३२) असं मयत युवकाचे नाव असून सदरील युवकाला सोमवारी दुपारी अचानक रक्ताची उलटी झाल्यानंतर त्याला तात्काळ आरोग्य उपचाराची गरज होती .वस्तीवरील लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत खांद्यावर व नंतर बैलगाडीतीतून चिखलमय रस्ता तुडवीत वस्तीहून अडीच ते तीन किमी असणाऱ्या वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची वाट धरली खरं परंतु उपचार करण्यासाठी नेत असताना त्यांना यावेळी मोठी कसरत करावी लागली . परंतु प्रयत्नाची पराकाष्टा करूनही आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी येण्यास उशीर झाल्याचे सांगत राजू पवार यास मृत घोषीत केले .

यावेळी पावसामुळे चिखलमय झालेला रस्त्याने त्याचा बळी घेतला असे स्थानिक नागरीकांचे म्हणने आहे . पारधीवस्ती वर समाजाची दहा पंधरा कुटूंबाची १०० पेक्षा जास्त लोक राहतात . याठिकाणी जाण्या येण्यासाठी मागील अनेक वर्षांपासुन पाठपुरावा करूनही त्यांना पक्का रस्ता मिळालेला नाही . प्रशासन व स्थानिक नेतेमंडळी यांनी नुसते आश्वासन देण्या पलीकडे काही केले नाही . असे उद्विग्न झालेल्या वस्तीवासीयांचे म्हणणे आहे . सोमवारी दुपारी सदरील युवकाची तब्येत खालावल्यावर स्थानिक नागरिकांनी वाघाळा येथे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार मिळावेत म्हणून जीवतोडून प्रयत्न केले . आणखी किती जीव गेल्यानंतर रस्ता करून देण्यात येईल असा प्रश्न आता वस्तीवर राहणारे पारधी बांधव करू लागले आहेत .

Leave a Comment