औरंगाबाद – शहरातील घाटी रुग्णालय आणि परिसरात शनिवारी पहाटे झालेल्या धुवाँधार पावसात पाणीच-पाणी साचले होते. रुग्णालयातील डिन बांगला, ॲम्ब्युलन्स पार्किंग परिसरात पाणीच पाणी झाले होते. त्या बाहेर कशा काढाव्यात, अत्यावश्यक रुग्णांना कशी सेवा पुरवावी अशी पंचायत ॲम्ब्युलन्स चालकांची झाली होती. गुडघ्या इतक्या पाण्यातून जाऊन चालकांनी त्या बाहेर काढल्या. याच ठिकाणी महात्मा फुले जीवनदायी योजनेचे कार्यालयही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घाटी प्रशासन साफसफाई स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे. नर्सिंग हाॅस्टेल, सर्जरी बिल्डिंग, डिन बंगला परिसर अक्षरशः घाणीने वेढलेला आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी घाण पसरलेली असल्यामुळे या परिसरात उंदीर, घुशी आणि सापांचा वावर वाढला आहे. यामुळे एकंदरीतच घाटी रुग्णालयातील स्वच्छता व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत आहे.
तसेच जीवनदायी योजनेच्या कार्यालयात परिसरामध्ये पाणीच पाणी साचले असल्यामुळे कार्यालयात कसे पोहोचावे असा प्रश्न सर्वसामान्य रुग्णांना पडला आहे. रुग्णांना विविध आजार आणि शस्त्रक्रियांसाठी जीवनदायी योजनेच्या कार्यालयातून मान्यता मिळाल्यानंतरच पुढील उपचार होतात. मात्र या परिसरात तळे साचले असल्यामुळे सकाळी उशिरापर्यंत त्रास सहन करावा लागला. अनेक रुग्णांचे नातेवाईक ताटकळलेल्या होते.
शनिवारी पहाटे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असला, तरीही घाटी प्रशासन परिसरातील साफसफाई स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे. या परिसरातील वाढलेले गाजर गवत आणि स्वच्छता ठेवली नसल्यामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचे रुग्णांचे व नातेवाईकांचे म्हणणे आहे. सध्या शहरात डेंग्यू चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत, अशा परिस्थितीत जर घाटी प्रशासनच स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असेल तर तेथे येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घाटी प्रशासनाच्या या बेजबाबदारपणा विरोधात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमधून संतापाची लाट उसळत आहे.