कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मानवी जीवनातील सुख हे व्यक्तीने आयुष्यभर जपलेल्या मुल्ल्यांवर अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा असल्या तरी, सुखाने जगण्यासाठी परस्पर प्रेम आणि विश्वास ही मुल्ये जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. कराड शहर पोलिस ठाण्याच्या वतीने ‘सुखाचा शोध’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात “सुखाचा शोध” या विषयावर डाॅ. यशवंत पाटणे यांचे व्याख्यान झाले. यावेळी पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर. पाटील, कराड तालुका पोलिस ठाण्याचे पो. नि. आनंदराव खोबरे यांची उपस्थिती होती.
यावेळी डाॅ. पाटणे म्हणाले, आजच्या जीवनशैलीत अतिरेकी चंगळवाद पहायला मिळत आहे. जीवन सौंदर्याची आणि संस्कृतीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. रोजच्या गतीमान जगात माणूस उत्कट आनंदाचे सूर हरवून बसला आहे. क्षणभंगूर सुखासाठी व्यसनात फसला आहे. सुखासाठी त्याची प्रचंड धावपळ सुरू आहे. पायाजवळच्या सुखापेक्षा दूर अंतरावरच्या सुखाची मोहिनी पडली आहे. मुळात कित्येक दुःख ही मानसिक असतात. खरे सुख अंतरिक असते ते सुख शोधता आले पाहिजे.
डॉ. पाटणे म्हणाले. माणसाच्या जीवनात सुख आहे तसे दुखही आहे. पण सकारात्मक विचारातून यातून मार्ग काढता आला पाहिजे. माणसाने शास्वत सुखासाठी मनाच्या शेतीत श्रद्धेची, सद्विचारांची बिजे पेरावी लागतात. उत्तम ग्रंथांच्या संगतीत यावे लागते. चांगल्या मोहावर मात करीत सवयी टिकावाव्या लागतात. आणि मुल्यांची पूजा बांधावी लागते. हे जीवन सुंदर आहे. त्यासाठी माणसाने सकारात्मक दृष्टीकोण स्वीकारला पाहिजे, असेही डॉ. पाटणे म्हणाले. डॉ. पाटणे यांच्या सुरेल वाणीने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांनी रसिकांना कधी खळखळून हसवले तर कधी आत्मभान दिले.