अमरावती प्रतिनिधी । गर्भापासून संस्कार ही काळाची गरज आहे. बलदंड शरीर आहे पण संस्कारीक मन नाही. आज समाजाला संस्कारीक मनाची गरज आहे. स्त्री ही कुठल्याही धर्माची असो तीचं संरक्षण करणं ही प्रत्येक तरुणाची जवाबदारी आहे. याकरिता प्रत्येक घराघरांतून मनाचे संस्कार होणे गरजेचं असल्याचे मत प्रसिद्ध शिवव्याख्याते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
राजे छत्रपतींच्या श्रेष्ठतम विचारांचा संस्कार ग्रामीण भागातील युवक युवतींवर व्हावा व तो चिरंतर रहावा. शिवरायांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आजही आव्हाने पेलता यावी. याकरिता शिवजयंतीच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा येथील छत्रपती शिवाजी कला महाविद्यालयात सुप्रसिद्ध शिवव्याख्याते गुलाबराव पाटील यांच्या शिव व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या व्याख्यानाचा आनंद राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांसोबत जमिनीवर बसून घेतला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी जिजाऊ मॉ साहेबांपासून शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून सांगितला.