सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्यातील महत्वाचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याकडे पहिले जाते. येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. तर भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांची सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे. मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी यापूर्वी शिरूर, दौंड व भोर पालिकेत काम केले आहे. आता सातारा शहरातील प्रश्नी व येथील नगरसेवकांचे प्रश्न कशा प्रकारे ते मार्गी लावणार?, असा सवाल सातारकरांतून विचारला जात आहे.
सातारा पालिकेत यापूर्वीचे मुख्याधिकारी असलेले अभिजित बापट यांनी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी प्रशासकीय कामकाजाचा उत्तम समन्वय साधण्याचे काम केली. सातारा पालिकेचा प्रशासकीय कारभार उत्तम रीतीने हाताळल्यानंतर अभिजीत बापट यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी पदोन्नती करण्यात आली आहे. बापट यांची सोलापूर महापालिकेतून सातार्यात दि. 12 ऑगस्ट 2020 रोजी मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती.
कोरोनाचा संक्रमणकाळ, प्रशासकीय कामांना गती देण्याचा प्रयत्न, नगरोत्थानच्या निधीसाठी विकास कामांचे नवीन प्रस्ताव सुरू असताना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने वर्णी लागल्याचा लेखी आदेश नगर विकास विभागाला शुक्रवारी उशीरा प्राप्त झाला. अभिजित बापट यांची बदली झाल्याने भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्याकडे सातारा पालिकेची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.