Saturday, March 25, 2023

लाॅकडाउन उठवल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता – रोहित पवार

- Advertisement -

मुंबई । कोरोना प्रादुर्भावामुळे देशात मागील दोन महिन्यांपासून देशात संचारबंदी राबविण्यात आली आहे. यादरम्यान उद्योग व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रमुख शहरामध्ये संचारबंदी आहे. पर्यायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेत प्रभावी घसरण झाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारसोबत राज्य सरकार संचारबंदीचे नियम शिथिल करण्यावर विचार करत आहेत. हळूहळू ते शिथिल केलेही जात आहेत. मात्र नियम शिथिल केल्यावर रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आपण पाहिला आहे. संचारबंदी उठवली तर रुग्णसंख्या लक्षणीय संख्येत वाढेल अशी भीती राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. पण यातून सुवर्णमध्य काढला पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.

आपल्या ट्विटर अकॉउंट वरून पवार यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, “काही विकसित देशांमध्ये लॉकडाऊन उठवल्यानंतर केसेसचं प्रमाण वाढलं. त्याप्रमाणे आपल्याकडेही लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर केसेस वाढल्या आहेत. लॉक डाऊन उठवल्यानंतर तर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याला सामोरं जाण्याचीही तयारी आपल्याला ठेवावी लागेल.” देशातील पाचव्या टप्प्यातील संचारबंदी आता सुरु होते आहे. त्यामुळे त्यांनी लोकांना सावधगिरीने वावरण्यासाठी असे ट्विट केले आहे. अर्थव्यवस्था हा देखील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे पुढे संचारबंदी चालू ठेवणे हाही फारसा उत्तम पर्याय नाही आहे. त्यामुळे नियम शिथिल करण्याची गरज आहे.

- Advertisement -

 

याबरोबरच कोरोनाचा धोका असणाऱ्या लोकांची काळजी घेण्याबाबत ते म्हणाले, “देशांत सर्वाधिक टेस्ट महाराष्ट्रात होत असल्या तरी येत्या काळात त्यात वाढ करावी लागेल. आरोग्याच्या काळजीसोबतच अर्थकारणाचाही विचार करुन दोन्हींचा सुवर्णमध्य साधावा लागेल. शिवाय ५५ वर्षांपुढील नागरिक, गर्भवती, लहान मुलं व आजारी व्यक्ती यांना गर्दीपासून दूर ठेवावं लागेल.” भविष्यात कोरोनाशी सर्वाना घराबाहेर पडून, सामाजिक अलगावचे सर्व नियम पाळून लढा द्यावा लागणार आहे. पण यासोबत काळजी आणि सावधगिरी बाळगणे तितकेच गरजेचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.