औरंगाबाद – शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तसेच उस्मानाबाद उप परिसरातील सर्व विद्याशाखांतील बारावी उत्तीर्ण या पात्रते वरील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यापीठात बुधवारपासून नऊ पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ही नोंदणी 3 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर करता येणार असून प्रवेशासाठी कुठलीही सीईटी नसणार आहे. गुणवत्तेच्या आधारे 14 सप्टेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन तात्काळ वर्ग सुरू होतील असे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली 9 आणि 12 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत पदवी अभ्यासक्रमांसाठी 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणा-या संदर्भात चर्चा झाली होती. बारावीनंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार असून त्यामध्ये विद्यापीठातील बी. वोकेशनल ऑटोमोबाईल इंडस्ट्रियल ऑटोमेशन (पदवी), ॲडव्हान्स डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ॲंड ग्राफिक्स आर्ट ॲन्ड सायन्स (डिप्लोमा), सर्टिफिकेट ऑफ प्रोफिसायन्सी इन चायनीज, जर्मन, फ्रेंच (डिप्लोमा), ॲडव्हान्स डिप्लोमा ऑफ प्रोफिसायन्सी इन चायनीज जर्मन फ्रेंच (ॲडव्हान्स डिप्लोमा), बी. ए. जनसंवाद आणि वृत्तपत्रविद्या (पदवी), बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स बी पी ए (पदवी), बी एफ ए ब्रीज कोर्स (पदवी एक वर्ष), सर्टिफिकेट इन मोडी स्क्रिप्त (पदविका), या विषयांचा समावेश आहे.
या सर्व अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची सिटी नसणार आहे. तर गुणवत्तेच्या आधारावर 4 ते 14 सप्टेंबर दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येऊन रसिकांना सुरुवात होईल असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ. विष्णू कऱ्हाळे यांनी कळवले आहे.