औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.त्यामुळे पुर्णतः लॉक डाऊनला लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत गजबजणारा आणि गर्दीचा रस्ता म्हणून औरंगाबाद शहरातील जालना रस्ता ओळखला जातो. सकाळी शहरात येणाऱ्या वाहनांची गर्दी या मुख्य रस्त्यावर अधिक पाहायला मिळते. शहरातील रस्त्यावरील चौकांत दररोज दिसणाऱ्या गर्दीऐवजी भयाण शांतता पाहायला मिळाली.
कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद शहर व जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन जाहीर केल आहे.
शनिवारी पहिल्या दिवशी लॉकडाऊनला नागरिक व व्यापाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, शहरासह जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ वैद्यकीय सेवा, औषधांची दुकाने व काही पेट्रोलपंपाचा अपवाद वगळता सर्वत्र बंद असल्याने बाजारपेठा व रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
औरंगाबाद पोलीस आणि आरटीओ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा चालकांना मास्क वापरणे, आणि रिक्षात दोनच प्रवासी वाहतूक करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यासाठी आरटीओ कार्यालयाकडून 4 पथके निर्माण करण्यात आली आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठेत शांतता दिसून आली.कॅनॉट मार्केट, मुकुंदवाडी भाजी मंडई, त्रिमूर्ती चौक, शिवाजी नगर, गजानन महाराज मंदिर, चिस्तीय चौक, सिडको बस स्थानक, सेव्हन हिल, पुंडलिक, नगर, जय भवानी नगर, गुलमंडी, आकाशवाणी चौक आदी परिसरात टाळेबंदीला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे पहायला मिळाले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा