आम्ही लग्नाळू ! महिलेचे फोटो भावी पत्नी म्हणून स्टेटस ठेवले, अन् मग…

औरंगाबाद – ओळखीच्या विवाहित महिलेची छायाचित्रे आपली भावी पत्नी म्हणून स्वतः च्या व्हॉट्सॲपवर आणि इन्स्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवणाऱ्या दोन लग्नाळू तरुणांना सायबर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. प्रवीण मदन तुपे (27, रा. मिसारवाडी) आणि सुमित धीरज मोरे (19, रा. पृथ्वी पार्क, पडेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सायबर पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार विवाहितेचे पतीसोबत पटत नसल्याने ती तिच्या लहान बाळासह शहरात राहते. वाहनचालक आरोपी तुपेसोबत तिची गतवर्षी ओळख झाली होती. यातून पुढे काही दिवसांनी त्यांची मैत्री झाली. तुपेने तिला लग्नाची मागणी घातली. तिने त्याला स्पष्ट नकार दिला. मात्र तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. एवढेच नव्हे तर मोरे यानेही तुपेप्रमाणेच तिची छायाचित्रे स्वतः च्या इन्स्टाग्राम आणि व्हाॅट्सॲप स्टेटसवर अपलोड करून तिला भावी पत्नी असे संबोधित करण्यास सुरुवात केली.

या प्रकारामुळे तिची समाजात बदनामी होऊ लागली. या दोघांमुळे आपला विनयभंग आणि बदनामी झाल्याची तक्रार तिने 27 डिसेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पोलीस निरीक्षक गौतम पातारे, कर्मचारी गोकूळ कुतरवाडे, राम कवडे आणि अमोल सोनटक्के यांच्या पथकाने तपास करून आरोपीविरुद्ध पुरावे गोळा केले आणि मंगळवारी त्यांना अटक केली.