औरंगाबाद – सामान्यांच्या संरक्षणासाठी तत्पर असलेल्या पोलिसाचा ग्रामस्थांच्या मध्यस्थीमुळे जीव वाचला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथे धक्कादायक घटना घडली आहे. दोन व्यक्तींमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाचा जीव घेण्याचा प्रयत्न भररस्त्यात झाला आहे. यामुळे परिसरात तणावपूर्ण स्थिती होती.
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे दोन व्यक्तींचा काही कारणावरुन वाद झाला. तो मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाच्या गळ्यात दोरी टाकून आवळण्याचा प्रयत्न दीपक वाकचौरे व मारुती वाकचौरे या दोघांनी केला. पोलिस कर्मचाऱ्याचे नाव कृष्णा पवार आहे.
घटनास्थळी असलेल्या एकाने सदरील घटनेचा व्हिडिओ चित्रित करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पोलिस आणि उपस्थित ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने पोलिसाचा जीव वाचला असून या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करित आहेत.