औरंगाबाद : जीवलग मित्राला मध्यरात्री, मी आत्म्हत्या करत आहे, मित्राकडे 18 हजार रुपये आहेत, त्याच्याकडून घेऊन ते वडिलांना देऊन टाक, असा मेसेज करुन एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी क्रांतीचौक पोलिस कॉलनीत हा प्रकार समोर आला. किरण शेषराव मोरे, 24 असे त्याचे नाव आहे.
सिल्लोड ग्रामिणला हेड कॉन्स्टेबल असलेले शेषराव मोरे सद्या पत्नीसह सिल्लोडला बदली झाल्याने तिकडे स्थलांतर झाले. त्यांच्या नावे असलेले पाेलिस कॉलनीत घरात किरण राहत होता. त्यांचा मोठा मुलगा नोकरी करतो. किरण देखील नेहमी सिल्लोडला ये-जा करत हाेता. रविवारी मध्यरात्री किरणने त्याच्या जवळच्या मित्राला आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला. त्यानंतर दुसरा मेसेज पैशा संदर्भात केला. परंतू त्यावेळी मित्र झोपलेला होता. सकाळी उठल्यानंतर त्याने मेसेज पाहताच त्याने त्याच्या घराकडे धाव घेतली. मात्र, किरण लटकलेल्या अवस्थेत आढळला.
त्यानंतर जवळच असलेल्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात त्यांनी धाव घेऊन हा प्रकार सांगितला. वरीष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. किरणच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. दोन वर्षांपुर्वीच त्याला वडिलांनी दुचाकी घेऊन दिली होती. मात्र, तो रागिट स्वभावाचा होता, त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सहायक फौजदार एजाज शेख अधिक तपास करत आहेत.