दहिवडी | माण पंचायत समिती परिसरामध्ये दारूच्या बाटल्या सध्या दिसत आहे. या बाटल्या आल्या कशा अशी चर्चा जनता करत आहे. यासोबत या परिसरामध्ये पुरुषांचे असलेले शौचालय व मुतारी व्यवस्थितपणे साफ केले जात नाही. यामुळे पंचायत समितीच्या प्रशासकीय अधिकारी व सभापती पंचायत समिती सदस्य यांच्या विरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आहे. माण पंचायत समितीच्या परिसरात अस्वच्छता आणि दारूच्या बाटल्यांनीच सजल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
स्वच्छ भारत मिशन अभियानावर शासनाकडून करोडो रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. त्यास ग्रामीण भागातील लोकांनी देखील चांगला प्रतिसाद देऊन गाव स्वच्छतेसाठी स्वच्छता अभियान, शौचालयाचे बंधकाम, गटारमुक्त गाव करण्यासाठी अथक परिश्रम घेतले जात आहे. परंतु माण तहसील, पंचायत समितीसह अन्य प्रशासकीय इमारतीमध्ये तसेच शाैचालय व मुतारी येथे मात्र प्रचंड घाण पसरली असून, हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार असाच असल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या सूचनावरून स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्च करुन विविध प्रकारे जनजागृती कार्यक्रम राबविले आहेत.
यामध्ये माण येथील तहसील, पंचायत समिती, गटशिक्षण आणि विविध कार्यालायाच्या भिंती पान, गुटख्याच्या पिचकार्यांनी रंगलेल्या आहेत. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आणि काटेरी झाडे- झुडपे पसरले असून, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. हीबाब लक्षात घेऊन सर्व कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवून पसरलेला घाणीचा विळखा दूर करावा आणि मगचं ग्रामीण भागातील गावकऱ्यांना आणि जनतेला स्वच्छतेच्या सूचना द्याव्यात अशा तिखट प्रतिक्रिया कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरीकातून व्यक्त होत आहेत.
पंचायत समिती सदस्य कुठे आहेत ?
माण तालुक्यातील सर्व पंचायत समिती सदस्यांना फक्त मतदारांची आठवण निवडणुकीपुरती येते. पंचायत समिती सदस्य हे फक्त चहापाणी करण्यातच व्यस्त असतात. मात्र सदस्यांना या पंचायत समिती परिसरात स्वच्छता आहे का ? हे सुद्धा पाहायला वेळ नसतो.
सभापती बदले मात्र
दहा मधील आठ पंचायत समिती सदस्यांनी एकत्र येऊन अविश्वास ठराव आणून सभापती बदलले. मात्र अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत अजिबात बदलली नाही. त्यासोबतच सर्वसामान्य जनतेला न्याय दिला जात नाही, अशी चर्चा सर्वत्र केली जात आहे. सभापतींनी पंचायत समिती परिसराची स्वच्छतेची पाहणी करणे गरजेचे आहे.