मागच्या दोन तीन दिवसांपासून पुण्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. काल (25) दिवसभर झालेल्या पावसामुळे पुण्यातील पावसाबाबत एक नवा रेकॉर्ड झाल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात 1938 नंतर म्हणजेच तब्बल 86 वर्षांनी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील आयएमडी स्टेशनवर 131मिमी पावसाची नोंद झाली आहे. यातील बहुतांश पाऊस दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेमध्ये झाला आहे.
1938 मधील 132.3 मिलिमीटर पुण्यातील सप्टेंबर मधील सर्वाधिक पावसाचा विक्रम मोडला गेला आहे. कारण IMD Pune यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी 133 मिमी पावसाची नोंद पुण्यात झाली आहे.
शाळा महाविद्यालयांना सुट्टी
दरम्यान मुंबई भारतीय हवामान शास्त्र विभागाने मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अनेक शहरांना वादळ आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
मोदींचा पुणे दौरा रद्द
आज पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा पुणे दौरा मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे रद्द करण्यात आला आहे. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण,तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होणार होता.