सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोड्या सारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी पळाले आहेत. लॉकअपचे दार तोडल्यानंतर पाच दरोडेखोरांनी पोलिस ठाण्यातील पोलिसांना मारहाण केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पहाटे 3 वाजता घडली असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे जिल्हा दौऱ्यावर असताना ही घटना घडल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले (सर्व रा. बीड व अहमदनगर) जिल्हा अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संशयित दरोडेखोरांना नुकतेच गंभीर गुन्ह्यात अटक केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, औंध पोलिस ठाण्यात पळून गेलेल्या दरोडेखोरांना ठेवण्यात आले होते. दरम्यान आज पहाटे दरोडेखोरांनी लॉकअपचे दार तोडून पोलिसांना मारहाण करत पलायन केले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सातारा पोलिस दल अलर्ट झाले असून दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. पोलीस प्रशासनाला हाय अलर्ट झाले असून साताऱ्यातून डीवायएसपी, स्थानिक पोलिस शाखेचे कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणावर फौजफाटा घेऊन दाखल झाले आहेत. संबंधित पोलीस यंत्रणेकडून दरोडेखोरांना पकडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
एका दरोडेखोराला पकडले
सातारा जिल्ह्यातील औंध पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या पाच दरोडेखोरांनी आज सकाळी लॉकअप तोडून पलायन केले. या दरोडेखोरांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले असून, याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. या पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव हे राहुल भोसले असे आहे.