कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मजकूर लोकांना कळेल अशा बोलीभाषेत सांगणारा व्यक्ती म्हणजे पत्रकार असतो. समाजात आपली अोळख निर्माण करण्यासाठी वेगळी वाट निर्माण करावी लागते. पत्रकारांची लेखणीतून न्याय देण्याची भूमिका असली पाहिजेच, परंतु जे वेगळेपण जपतात त्यानाच समाजात एक वेगळी उंची मिळते. तेव्हा लिहते रहा, त्यासाठी वाचत रहा असा सल्ला सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिला.
कराड येथील अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये पत्रकार दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ कराडच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास लायन्स क्लबचे द्वितीय उपप्रांतपाल भोजराज निंबाळकर, सातारचे जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, लायन्स क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष खंडू इंगळे, खजिनदार मिलिंद भंडारे, सचिव संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. पाटील म्हणाले, मनापासून केलेले काम हे आयुष्यभर टिकते. पत्रकारांनीही अगदी तळमळीने केलेल्या कामाची समाजाकडून त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नक्कीच पोच मिळते. समाजाने पाठीवर दिलेली हीच कौतुकाची थाप अत्यंत महत्त्वाची असते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन राजेश शहा यांनी केले.