औरंगाबाद | गेल्या दोन महिन्यापासून आरटीओचे काम ठप्प होते. ते काम आज पासून सुरू करण्यात आले आहे. विविध कामासाठी अपॉइंटमेंट देण्यास सुरुवात करण्यात येणार असून कामे नियमित सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.
आरटीओ कार्यालयात वाहनांसंबंधी च्या कामासाठी जिल्हाभरातून येणार्या वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता आरटीओ कार्यालयात वाहनधारकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. कार्यालय ही केवळ 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्याचे आदेश असल्याने आरटीओतील पूर्णच कामकाज जवळपास ठप्प झाले होते. त्याचबरोबर शिकाऊ परवाना व पक्का परवान्याचे ही काम बंद करण्यात आले होते. त्यामुळे आरटीओ शुकशुकाट पसरला होता.
नुकतेच राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. यात शासकीय कार्यालय शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशानुसार सोमवारी विविध कामासाठी लागणाऱ्या अपॉइंटमेंट देण्याचे काम सुरू करण्यात येणार असून इतर कामे नियमितपणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यांनी दिली.