सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्यातील तुंग येथील कृष्णा नदीपात्रात गेले चार दिवस सुमारे १२ फूट लांबीच्या मगरीचे दर्शन होत आहे. ही मगर दुपारच्या सुमारास नदीकाठी असणाऱ्या पोटमळीमध्ये पडलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरामध्ये शेतीला पाणी देणाऱ्या तब्बल बाराहून अधिक मोटारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोटारीच्या कामासाठी सातत्याने ये-जा करावी लागते.
परंतु, ही मगर त्याच परिसरात असल्याने भीतीपोटी त्या मोटारीकडे जाण्यास शेतकरी धजावत नाही. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. या पार्श्वभूमीवर मगरीचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांच्यामुळे मिरज पश्चिम भाग त्रस्त बनला आहे.
मगरींचे वारंवार दर्शन होत आहे. या मगरींनी नागरिक, महिलांवर अनेकदा हल्ले केले आहेत. आतापर्यंत भिलवडी ते डिग्रज बंधारा परिसरात 12 मगर बळींच्या घटना झाल्या आहेत.