राज्य सरकारने नुकसानग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करावे – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी तालुक्यातील आंबेघर व मोरगिरीमधील पूरग्रस्त गावऱ्यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त लोकांना तोकडी मदत न करता कायमस्वरूपी मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापूराच्या संकटाची परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी पाटण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोरगिरी गावातील शाळेत असणाऱ्या दरडग्रस्त लोकांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर फडणवीस व दरेकर यांनी आंबेघर दुर्घटनेतील नुकसानग्रस्त लोकांसमवेत शाळेतच जेवण केले. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी फडणवीस म्हणाले कि, आज याठिकाणी हे लोक शिबिरात राहत असले तरी त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनावर लक्ष केंद्रीत करून ते तातडीने करावे लागेल. सुरक्षित जागा शोधून त्यांना नवीन घरे बांधून द्यावी लागतील. पुनर्वसन करताना त्यांच्याशी सल्लामसलत करावी, अशी सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना केली. या नागरिकांना इतर मदत, विविध माध्यमातून पोहोचते आहे. पण पुनर्वसन हेच प्राधान्य असले पाहिजे. यासाठी घरे आणि रोजगार असा साकल्याने विचार करावा लागेल. भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये, याची सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.