कराडजवळ टेम्पोची रिक्षाला पाठीमागून धडक, रिक्षाचा चक्काचूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे- बेंगलोर महामार्गावरती नांदलापूर फाटा येथे टेम्पो- रिक्षाचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून प्राथमिक माहितीनुसार 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 4 मे रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, कराडहून- कोल्हापूरच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. टेम्पोने (MH-14-JL-8188) रिक्षाला (MH-11- M-8562) पाठीमागून धडक दिली असून पाचजण जखमी झाले आहेत. जखमीत एका लहान मुलीचा समावेश आहे. रिक्षा कराड- उंडाळे मार्गावर प्रवाशी वाहतूक करणारी आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठा आवाज झाल्याने अपघातस्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती. जखमींना कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा उडाला. कराड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व्यवस्थित केली. तसेच हायवे हेल्पलाइन कर्मचाऱ्यांनी तात्काळ वाहने बाजू केली.