मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद, 46 नगर परिषदांची मुदत संपली 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
औरंगाबाद – मराठवाड्यातील 3 महापालिका, 8 जिल्हा परिषद आणि 46 नगर परिषदांसह 2 नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी एकाच वेळी निवडणुका घेणे अशक्य असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी निवडणुका घेण्याबाबत निकाल दिल्यानंतर विभागातील मनपा, जि.प., न.प. निवडणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद महापालिकेची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपली आहे. लातूर, परभणी मनपाची मुदत मे 2020 मध्ये तर नांदेड-वाघाळा मनपाची मुदत ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदांवर प्रशासक काम पाहत आहेत. हिमायतनगरची मुदत जानेवारी 2021 मध्ये संपली आहे. रेणापूर नगरपंचायतीची जून 2022 मध्ये संपणार आहे. तर फुलंब्री नगरपंचायतीची मुदत जानेवारी 2023 मध्ये संपेल.
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, कन्नड, गंगापूर, पैठण, बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, गेवराई, परळी, हिंगोलीतील कळमनुरी, हिंगोली, वसमतनगर, जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड, परतूर, जालना, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, उद्गीर, निलंगा, औसा, नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी, मुखेड, कंधार, बिलोली, देगलूर, मुदखेड, धर्माबाद, उमरी, हदगाव, भोकर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग, भूम, परंडा, मुरूम, उस्मानाबाद, कळंब, उमरगा या नगर परिषदांची मुदत संपली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पूर्णा, पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू, गंगाखेड नगर परिषदांमध्ये निवडणूक घ्यावी लागणार आहे.
फक्त चार न.प.मध्ये निवडणुका नाहीत –
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगर परिषदेची मुदत एप्रिल 2024, वैजापूर न.प. मे 2023, नांदेड जिल्ह्यातील लोहा न.प.जानेवारी 2024 तर किनवट न.प.ची मुदत जानेवारी 2023 मध्ये संपणार आहे. बाकी उर्वरित ठिकाणी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.
सगळीकडे प्रशासकराज –
सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाची पूर्ण प्रत अद्याप प्रशासनाला मिळालेली नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडूनच पूर्ण मार्गदर्शन येईल, तेव्हा माहिती मिळू शकेल. सध्या तरी विभागातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक काम पाहत असल्याचे नगरपालिका प्रशासन सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment