औरंगाबाद | दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरांना एमायडीसी वाळूज पोलिसांनी मंगळवारी रात्री पंढरपूर येथील कामगार चौकातून अटक केली आहे. त्याबरोबरच बजाज नगरातून कमळापूर येथील मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यालाही अटक केली आहे.
अजय गजानन ढोके (20, रा. हारुसिद्धी मंगल कार्यालाजवळ, कमळापूर), अनिल गौतम म्हस्के (30, रा. फुलेनगर, वडगाव), राहुल शिवप्रसाद सिंग (22, रा. शिवराणा चौक, बजाजनगर) अशी या आरोपींची नावे असून पोलिसांनी हा त्यांच्या जवळून चोरीची दुचाकी तसेच कमळापूर मंदिरातून चोरी गेलेला पितळी मुकुट निरंजन आदी साहित्य असा साडे चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बजाज नगर येथील शुभम बागल यांची दुचाकी (एमएच 20, एक्स 2068) दोन ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. त्याच दिवशी रात्री कमळापूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अज्ञात चोरट्याने पितळी, मुकुट, निरंजन, दिवा आदी साहित्य चोरून नेले होते. या प्रकरणी तपास करत असताना एमायडीसी वाळूज येथे चोरटे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी कामगार चौकात सापळा रचून संशयित चोरटे दुचाकीवरुन जात असताना त्यांची चौकशी केली आणि त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याजवळून चोरीची दुचाकी तसेच कमळापूर येथील मंदिरातून चोरी केलेली साहित्य जप्त केले.