औरंगाबाद | 44 लाख 50 हजार रुपये घेऊन करारनाम्यानुसार बांधकाम पूर्ण न करता घरमालकाची फसवणूक केल्याची घटना या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी सातारा ठाण्यात दोन बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश धनसिंग ठाकूर आणि सचिन धनसिंग ठाकूर असे या आरोपीची नावे आहेत. दोघेही नूतन वसाहत, जालना येथे राहतात. सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे मे. टी. एस बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स हा त्यांचा भागीदारी व्यावसाय आहे.
30 एप्रिल 2014 रोजी सातारा परिसरात खरेदी केलेली जमीन जमीनदाराने आरोपी बिल्डर्सला बांधकामासाठी दिली होती. या जमिनीवर आरोपी बिल्डर हे 8 फ्लॅटचे अपार्टमेंट बांधून देणार आणि याचा सर्व खर्च आरोपी बिल्डर्स करतील. या बदल्यामध्ये त्या जमीनदाराचे त्या अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावर दोन आणि चौथ्या मजल्यावर दोन असे एकूण चार प्लॉट देण्यात येईल आणि बाकीचे प्लॉट या जमीन मालकाचे राहतील. आणि 18 महिन्यात हे बांधकाम पूर्ण करून देतील असा करार करण्यात आला होता.
नंदा विठ्ठलदास वैष्णव (रा. साईनगर सिडको) असे या जमीनदाराचे नाव आहे. या आरोपी बिल्डरने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील प्रत्येकी दोन फ्लॅटचे बांधकाम पूर्ण केले. आणि चौथ्या मजल्यावरील प्लॅटचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. जमीनदार यांच्या हक्कातील पहिल्या मजल्यावरील दोन प्लॉटचे 27 लाख 50 हजार आणि 17 लाखात विक्री केले. तेव्हा आरोपींनी इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जमीनदार यांना उसने पैसे मागितले. आणि उसने पैसे दिले तरच बांधकाम पूर्ण होईल आणि बांधकाम पूर्ण झाले की पैसे परत देईल असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून जमीनदाराने 44 लाख 50 हजार रुपये आरोपी बिल्डरच्या खात्यात जमा करण्यासाठी ना हरकत पत्र दिले.
परंतु परवानगी न मिळाल्याने चौथ्या मजल्यावरील बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे जमीनदाराने पैसे परत मागितले असता आरोपींनी रक्कम परत करण्यास नकार दिला. यामुळे आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात आले तसेच वैष्णव यांनी सातारा ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक सुरेंद्र मराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडणे हे तपास करत आहेत. दोन्ही आरोपी भाऊ असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.