Saturday, February 4, 2023

पाय घसरल्याने डोंगरावरून पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू;पोलीस होण्याचे स्वप्न राहिले अर्धवटच…

- Advertisement -

औरंगाबाद प्रतिनिधी | पोलीस खात्यात भरती होण्यासाठी मैदानी सराव करण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीचा पाय घसरून ती 100 फूट खोली पडली. यातच तिचा मृत्यू  झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास तासगाव येथील खवड्या डोंगरावर घडली. या दुर्दैवी घटनेमुळे तिचे पोलीस होण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले आहे.  या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुनीता देविदास शेळके वय-21 (रा.रांजणगाव  शेनपुंजी) असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. या दुर्दैवी घटने प्रकरणी भाऊ भीमराव शेळके यांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  सुनीताच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्याचा भाऊ भीमराव उचलायचा. सुनीताला पोलीस व्हायचे होते. तिचे स्वप्न होते की, पोलीस होऊन घराच्या हालाखीच्या परिस्थितीतून परिवाराची सुटका करायचे. त्यामुळे सहा दिवसांपूर्वी ती नांदेड हुन आल्यानंतर  लहान बहीण शिल्पा आणि मावस भाऊ रामेश्वर गिरी यांच्या सोबत रोज पहाटे मैदानी सरावासाठी जायची.

- Advertisement -

आज सकाळी तिघांनीही सराव केला व खाली आले. त्यानंतर शिल्पा आणि सुनीता या दोघी पुन्हा डोंगरावर धावण्यासाठी गेल्या मात्र धावताना सुनिताचा पाय घसरला आणि ती खवड्या डोंगरावरून शंभरफुट खाली डोक्यावर पडली डोक्यावर गंभीर जखम झाल्याने रक्तस्त्राव ही भरपूर झाला. उपस्थितांनी सुनीताला तातडीने  शासकीय 108 रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात हलविले. मात्र तेथे वैधकीय अधिकाऱ्यांनी तपासून सुनीताला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.