तब्बल दोन कोटी लोकांनी पाहिला शिवरायांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा भव्य दिव्य अनावरण सोहळा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी शुक्रवारी रात्री तोबा गर्दी केली होती. त्यासोबतच घरी बसून लाईव्ह पद्धतीने हा सोहळा तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी पाहिला आहे.

महापालिकेने बसविलेल्या क्रांती चौकातील शिवरायांच्या 21 फुटी अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात करण्यात आले. हा पुतळा देशातील सर्वांत उंच, सात टन वजनाचा तसेच एकूण 52 फूट उंचीचा आहे. त्यामुळे पुतळ्याविषयी प्रचंड आकर्षण होते. तसेच लाइट अँड साउंड शो, फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी क्रांती चौकात तोबा गर्दी झाली होती. क्रांती चौकाच्या चारही बाजूंनी शिवप्रेमी नागरिकांची गर्दी झाली होती. या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून, पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे ऑनलाइन पद्धतीने देखील प्रक्षेपण करण्यात आले. महापालिकेने प्रशासकांचे फेसबुक अकाउंट, स्मार्ट सिटीचे फेसबुक अकाउंट, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यालयाचे फेसबुक अकाउंट व यूट्युब, शिवसेनेची औरंगाबाद शाखा तसेच एका न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून अनावरण सोहळा नागरिकांनी पाहिला.

राज्यभरातील दोन कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी पुतळ्याचा अनावरण सोहळा पाहिल्याचा विक्रम झाला आहे, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. सोशल मीडियावर देखील सोहळ्याचे व्हिडिओ राज्यभर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.