Wednesday, June 7, 2023

वाल्मिकी परिसर एक उत्कृष्ट इको टुरिझम केंद्र म्हणून ओळखले जाईल : खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

वाल्मिकी मंदिर परिसर व त्यालगत असणारे जंगल हे येत्या काळात एक उत्कृष्ट इको टुरिझम सेंटर म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी निसर्ग अध्ययन केंद्र व परिसर विकासाची योजना आखत असून त्याचे भूमीपूजन जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सहाय्यक वनसंरक्षक सुरेश साळुंखे ,सहाय्यक वनसंरक्षक राजीव घाटगे, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, वनक्षेत्रपाल गोविंद लंगुटे, वनक्षेत्रपाल स्नेहल मगर, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार , वनक्षेत्रपाल अमित भोसले, वन्यजीव प्रेमी नाना खामकर, हेमंत केंजळे उपस्थित होते.

केंद्र शासनाकडून निसर्ग अध्यन केंद्राला निधी मंजूर झाला असून त्यात पानेरी येथील वाल्मिकी मंदिर लगतच्या जंगलात फुलपाखरू उद्यान, बाबू उद्यान, राशी वन, आरोग्य वन, नक्षत्र वन, धार्मिक वृक्ष लागवड, ऑर्किड उद्यान, गवत प्रजाती उद्यान, कॅक्टस उद्यान, स्थानिक रानफळे उद्यान केंद्र उभारले जाणार आहेत. या सर्व प्रकल्पाची सुरूवात आज खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते वृक्षलागवड करून करण्यात आली.

वाल्मिकी जंगल परिसरात निसर्ग पायवाटा निर्माण करून ठीकठिकाणी पेगोडा उभारले जाणार आहेत. तसेच पठारावर जाणारी वाट बांधण्यात येणार असून त्या वाटांवर निरीक्षण मनोरे उभारून चांदोलीचे जंगल व चांदोलीचे धरणाचे विलोभनीय पाणलोट क्षेत्र पर्यटकांना पाहण्यास मिळणार आहे. त्याचबरोबर पठारावर फुलणारी वेग वेगळी फुलणारी फुले ही पाहण्यास मिळणार आहेत.

जैविवीधेतेची माहिती देणारे फलक, सह्याद्रीचे पौराणिक व भौगालिक माहिती दर्शविणारे फलक ठीक ठिकाणी लावण्यात येणार आहेत. प्रवेशद्वार ते वाल्मिकी मंदीरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बांबू लागवड केली जाणार आहे. तसेच पक्षी निरीक्षणासाठी लपणगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. पशु – पक्ष्यांची चित्रे तसेच पुतळे बसवण्यात येणार आहेत.

वाल्मिकी मंदिराचे धार्मिक महत्व ओळखून त्या ठिकाणी येणाऱ्या भक्ताची सोय व्हावी, यासाठी प्रसाधन गृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था इत्यादी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून राबवाव्यात अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली.