सदाशिवगड विकासास विरोध केल्यास रस्त्यावर उतरु : पाच गावच्या ग्रामस्थांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील ऐतिहासिक अशा सदाशिवगडावर होणाऱ्या नियोजित रस्त्यास काही दुर्गप्रेमी, ट्रेकर्स व जिल्ह्यातील दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनांनी विरोध दर्शवला आहे. याचा खुलासा करण्यासाठी आज कराड येथील शासकीय विश्रामगृहात हजारमाची-सदाशिवगड, बाबरमाची, राजमाची, वनवासमाची, विरवडे ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ग्रामस्थांनी सदाशिवगड विकासास विरोध केल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा दिला.

कराड येथील पत्रकार परिषदेस हजारमाचीच्या सरपंच विद्या घबाडे, उपसरंपच प्रशांत यादव, बाबरमाचीच्या सरपंच सुनीता कदम, उपसरपंच राहुल कांबळे, राजमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने यांच्यासह पाच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. अॅड. कदम म्हणाले, सदाशिवगड पायथा व परिसरातील पाच गावांनीही वेळोवेळी गडावरील विविध कामांसाठी प्रयत्न केले आहेत. भूकंप संशोधन केंद्राच्या प्लॅननुसार गडावर जाणारा पायरी मार्ग पूर्णपणे बंद होत होता. अशावेळी ग्रामपंचायतीने पर्यायी जागा देवून पायरी मार्ग वाचवला. वनराईला तारेचे कंपाऊंड करून त्याचे जतन केले. सदर विधायक कामी मावळा प्रतिष्ठानला पाच गावच्या ग्रामस्थांनीही पाठींबा दिला.

किल्ले सदाशिवगडावर विधायक कामे करणाऱ्यांनाही या गावांनी आजवर सर्वोतोपरी मदत केली आहे. परंतु, आज त्यांच्याकडूनच विविध अफवा पसरवून गडावर होणाऱ्या नियोजित रस्त्यास विरोध केला जात आहे. ही बाब अतिशय गंभीर असून गडाच्या विकासास विरोध करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा हजारमाची-सदाशिवगड, बाबरमाची, राजमाची, वनवासमाची व विरवडे ग्रामस्थांनी दिला आहे. सदाशिवगड टेहाळणीचा किल्ला असून रस्ता व अन्य कामे करताना येथील मंदिर, इतर वास्तूंना कोणताही धोका पोहोचणार नाही. त्यामुळे यासंदर्भात कोणीही अफवा पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून नये, अशी भुमिका ग्रामस्थांनी मांडली.

Leave a Comment