औरंगाबाद | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या वाळूज येथील आठवडी बाजार तळावरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतला आहे.याप्रकरणी ग्रामपंचायतीने बहुमताने ठराव मंजूर केला असून गट विकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही गुरुवारी दिला आहे. वाळूज येथे करण्यात येणारा आठवडी बाजार हायटेक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे असे सरपंच सईदाबी पठाण यांनी सांगितले.
वाळूज येथील शासकीय गट क्रमांक 340 या ठिकाणी 45 वर्षापासून आठवडी बाजार भरतो. सकाळी सात ते रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बाजारपेठ सुरू असते. या ठिकाणी वाळूज महानगर, एमआयडीसी, रांजणगाव, रामराई या ठिकाणाहून ग्राहक भाजी खरेदीसाठी येतात. या बाजार लिलावातून ग्रामपंचायतीला वर्षाकाठी तब्बल आठ लाख रुपयांचा निधी मिळत असताना आठवडी बाजार तळावर सहा बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आल्यामुळे बाजाराला जाण्यासाठी रस्ताच नसल्यामूळे ग्राहकांनी बाजारात येणे बंद केले आहे. यामुळे दिवसेंदिवस लिलावातून ग्रामपंचायतीला मिळणारा महसूल कमी होत आहे.शासनाकडून वाळूज गावाचा समावेश राष्ट्रीय रुरबन मिशनमध्ये केला जाणार असून या योजनेतून आठवडी बाजार हायटेक केला जाणार आहे. यासाठी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यातून बाजार तळावरील अंतर्गत रस्ते, ओटे, निवारा, पिण्याचे पाणी, वाहनतळ, स्वच्छतागृहे आदी सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. या सुविधा लवकर मिळाव्या म्हणुन 6 मे 2019 रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने अतिक्रमणे हटवण्याची निर्देश दिले होते.
बाजार हायटेक करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर 26 जुलै रोजी अतिक्रमणे हटविण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला या ठरावावर सरपंच सईदाबी पठान, उपसरपंच योगेश आरगडे, फैयाज कुरेशी, पोपट बनकर, सचिन काकडे, तोफिक शेख, राहुल भालेराव, विमल चापे, समीना पठाण आम्ही नाभी पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या देण्यात आल्या आहेत. अतिक्रमणे काढण्यासाठी सव्वीस पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने तसा प्रस्ताव सीईओकडे पाठवलेला आहे. असे सरपंच सईदाबी पठाण यांनी सांगितले.