कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला. यामध्ये कराड तालुक्यातील तांबवे गावात सलग दोन दिवस पूर आलेला होता. पूरातील पाण्यामुळे गावातील रस्त्यांवर तसेच नदीकाठच्या पाणवठ्यावर गाळ साचलेला होता. साचलेला गाळ काढण्यासाठी तांबवे गावची तरूणाई एकवटली अन् एका दिवसात संपूर्ण गाव स्वच्छ केला.
तांबवे गावात पूर आेसरल्यानंतर स्मशानभूमी परिसरात गाळ साचलेला होता. या परिसरात गाळ साचल्याने दुचाकी चालकांना कसरत करावी लागत होती. गाळातून प्रवास करणाऱ्या काही दुचाकी घसरलेल्याही होत्या. तेव्हा जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील व त्यांच्या युवक मित्रमंडळीनी पाण्याने रस्ता स्वच्छ धुवून काढला. रस्ता स्वच्छ केल्याने वाहन चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोयनेच्या महापुरामुळे तांबवेतील लोहार पाणवठा, खडा पाणवठा (रघुनाथ), ब्राह्मण पाणवठा या पाणवठ्यांवर साठलेला प्रचंड गाळ, पुरामुळे वहात आलेला कचरा यामुळे पाणवठ्यांवर जाणेच मुश्किल झाले होते. गावातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह अबालवृध्दांनी खोरी, पाट्या, टिकाव, पाणी फवारण्याठी इलेक्ट्रीक मोटर, पाईप घेऊन पाणवठ्यांवर जमा झाले होते. एका दिवसात पाणवठ्यांवर तसेच रस्त्यांवर श्रमदान करत स्वच्छ केले.