महिला महाविद्यालयात चोरी, कपाटांची तोडफोड

Mahila Mhavidyalay Karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | येथील महिला महाविद्यालयाच्या कार्यालयाचे ग्रिल कापून चोरट्यांनी कॉलेजमधील सुमारे 9 हजार 710 रुपये चोरून नेले. यावेळी चोरट्यांनी इंग्रजी व एनएसएस विभागामध्ये असलेल्या कपाटांची तोडफोड करून त्यातील रोख रक्कम पळवली. कॉलेजमध्ये चोरी व तोडफोडीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्राचार्या डॉ. स्नेहल राजेंद्र प्रभुणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, डॉ. स्नेहल प्रभुणे या महिला महाविद्यालय कराड येथे प्राचार्य म्हणून काम करतात. गुरुवार दिनांक 28 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कॉलेजमधील काम आटोपून त्या घरी गेल्या. त्यावेळी शिपाई संदीप पवार हे शाळेत होते. त्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास संदीप पवार हेही कॉलेजच्या ऑफिसला लॉक करून घरी गेले. दरम्यान, शुक्रवार दिनांक 29 रोजी सकाळी स्नेहल प्रभुणे घरी असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संदीप पवार यांनी त्यांना फोन केला व कॉलेजच्या ऑफिसचे ग्रिल कोणीतरी कापले आहे, तुम्ही लवकर या असे सांगितले. त्यामुळे त्या त्वरित कॉलेजमध्ये आल्या. त्यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली.

पोलिसही त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांबरोबर ऑफिसमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना लाकडी टेबलचा ड्राव्हर उघडा दिसला. त्यामधील 110 रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी कॉलेज परिसरामध्ये पाहणी केली असता इंग्रजी विभागामध्ये असणारी तीन लोखंडी कपाटांची तोडफोड करून त्यामधील 8 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले होते. तसेच कॉलेज इमारतीच्या वरील मजल्यावर असलेले एनएसएस विभागातील दोन लोखंडी कपाटाचीही चोरट्यांनी तोडफोड करून त्यातील 1600 रुपये चोरून नेले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देसाई करत आहे.