हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार (Ajit Pawar) … महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव…. राज्याच्या राजकारणात सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा पराक्रम अजितदादांनी केला. मात्र मुख्यमंत्रीपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. क्षमता आणि कामाची तयारी असूनही मुख्यमंत्रीपदाची संधी अजूनही न मिळाल्याची सल अजित पवारांच्या मनात अजूनही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी ती बोलूनही दाखवली… देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे माझ्यापेक्षा ज्युनिअर असून पुढे गेले आणि मी मात्र मागेच राहिलो असं दादांनी आपल्या भाषणात म्हंटल.. आता एकेकाळीचे अजित पवारांचे साथीदार आणि सध्याचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं विधान केलं आहे.
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
माढा दौऱ्यावर असताना जयंत पाटलांना विचारण्यात आलं कि जर अजित पवार महाविकास आघाडीसोबत असते तर ते मुख्यमंत्री झाले असता का? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, हो, अजित पवार महाविकास आघाडीकडून नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. महाराष्ट्रात सध्या चांगलं वातावरण आहे. राज्यात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असं चित्र आहे. त्यामुळे अजित पवार महाविकास आघाडीसोबत असते तर त्यांना सोईची परिस्थिती निर्माण झाली असती,” असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. जयंत पाटील यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
अजित पवार काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित ‘योद्धा कर्मयोगी’ या पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्यावेळी अजित पवार यांनी म्हंटल होते कि, देवेन्द्रजी, जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं की इतके इतके आमदार आणल्यानंतर मुख्यमंत्री करतो, तेव्हा मलाच सांगितलं असतं तर मी सगळा पक्षच घेऊन आलो असतो. जाऊद्या आता काय…शेवटी हा नशिबाचा भाग असतो. देवेंद्र फडणवीस यांची आमदार म्हणून टर्म १९९९ ला सुरू झाली, तर एकनाथ शिंदे यांची २००० ला सुरुवात झाली. यांच्यात सर्वांत सिनियर मी आहे, माझी सुरुवात १९९० मध्ये झाली. पण मी मागे राहिलो असं म्हणत अजित पवारांनी हसत हसत मनातील खंत बोलून दाखवली.