हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजवर आपल्या सर्वांनाच शाळेत शिकवण्यात आले की, पृथ्वीवर सुमारे 71 टक्के पाण्याचा साठा आहे. यामध्ये महासागर, नद्या, तलाव, सरोवरे यांचा समावेश आहे. परंतु, आता नुकत्याच संशोधकांनी केलेल्या संशोधकांत पृथ्वीवर पाण्याचा आणखीन एक नवीन स्त्रोत सापडला आहे. या संशोधकांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून (Earth Surface) सुमारे 700 किलोमीटर खाली (Beneath Earth) हा पाण्याचा साठा सापडला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या पाण्याच्या तिप्पट पृथ्वीच्या आत असलेले पाणी असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेमधील इलिनॉय येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली असलेल्या हा पाण्याचा साठा शोधून काढला आहे. या संशोधकांना पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली मोठा पाण्याचा साठा आहे अशी माहिती मिळाली होती. तसेच, रिंगवूडाइट नावाच्या मिनरलच्या महासागर असल्याचे देखील संशोधनात आढळून आले होते. त्यामुळे या माहितीच्या आधारे संशोधकांनी आपल्या पुढील संशोधनाला सुरुवात केली. यातूनच त्यांना हे निष्पन्न झाले की, पृथ्वीच्या आत सापडलेले पाणी पृथ्वीच्या भूपृष्ठभागावर असलेल्या पाण्यापेक्षा तिप्पट आहे.
याबाबतची माहिती देत नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ स्टीव्हन जेकबसेन यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, आम्हाला पृथ्वीवरील असलेले पाणी पृथ्वीच्या आतून आल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. याचाच आणखीन तपास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी 2000 सिस्मोग्राफ वापरले. यात त्यांनी गेल्या पाचशे भूकंपाचा अभ्यास केला आणि त्यांच्या लहरींचे परीक्षण देखील केले. यावेळी भूकंपांच्या लहरी पृथ्वीच्या गाभ्यांमधून गेल्यावर त्यांचा वेग कमी झाला असल्याचे समोर आले. तसेच, या संशोधनातून पृथ्वीच्या आतील खडकांमध्ये पाणी असल्याचे संशोधकांना समजले. आता संशोधक मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखीन खोल अभ्यास करीत आहेत.